Uncategorized

तोरणमाळच्या गोरक्षनाथ मंदिराची संरक्षण भिंत कोसळली – दुरुस्तीची मागणी

तोरणमाळच्या गोरक्षनाथ मंदिराची संरक्षण भिंत कोसळली – दुरुस्तीची मागणी

  1. नंदुरबार (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिराची पश्चिमेकडील संरक्षक भिंत कोसळली असून यशवंत तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मंदिराच्या गर्भगृहाला मोठा धोका होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी गुरु गोरक्षनाथ मठ मंदिराचे महंत योगी संजुनाथ महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
    तोरणमाळ येथील ऐतिहासिक गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिराला थेट धोका निर्माण झाला आहे. यशवंत तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या या मंदिराची संरक्षण भिंत या वर्षीच्या पावसाने कोसळल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी असला, तरी येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास तलावाच्या पाणीपातळीत वाढ होऊन मंदिराच्या संपूर्ण चौथऱ्याला धोका निर्माण होऊन गर्भगृहाची हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी तोरणमाळ परिसरातील ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे. गुरु गोरक्षनाथ मंदिराच्या संरक्षणासाठी यापूर्वी उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत कालांतराने जीर्ण झाली होती. गेल्या काही दिवसां पासून सुरू असलेल्या पावसामुळे ही भिंत अखेर कोसळली. परिणामी मंदिराभोवतीचे संरक्षण कवच नाहीसे झाले असून तलावाच्या दिशेने असलेला भाग असुरक्षित बनला आहे.
    सध्या पावसाचा वेग कमी असला, तरी मान्सूनचा जोर वाढल्यानंतर यशवंत तलावाची वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तलावाचे पाणी थेट कोसळलेल्या भिंतीच्या भागातून मंदिराच्या परिसरात झिरपू शकते. त्यामुळे मंदिराच्या पायाला धोका निर्माण होऊन भविष्यात संपूर्ण संरचनेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी तातडीने संरक्षणात्मक कामे हाती घेण्याची आवश्यकता आहे.
    सध्या तोरणमाळ परिसरात निसर्गाने हिरवाईची चादर पांघरली असून, पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. शनिवार-रविवारसह इतर दिवशीही येथे मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठीही भाविकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा.
    सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी असल्याने जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून तातडीने मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी गुरु गोरक्षनाथ मठ मंदिराचे महंत योगी संजुनाथ महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *